किल्ले मुरंजन उर्फ प्रबळगड हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील एक किल्ला आहे. हा किल्ला मुंबई-पुणे हमरस्त्यावरून दिसतो. पूर्वेला उल्हास नदी, पश्चिमेला गडी नदी, दक्षिणेला पाताळगंगा नदी, माणिकगड आणि नैऋत्येला कर्नाळा किल्ला आहे, तसेच जवळच असलेला इरशाळगड.
मुंबई-पुणे हमरस्त्यावर जाताना दिसणारा हा नावाप्रमाने बलवान असणारा एक दुर्ग चटकन आपले लक्ष वेधुन घेतो. पूर्वेला उल्हास नदी, पश्चिमेला गडी नदी, दक्षिणेला पाताळगंगा नदी, माणिकगड आणि नैऋत्येला कर्णाळा किल्ला आहे, तसेच जवळच असलेला इर्शाळगड असा चहुबाजूंनी वेढलेला हा किल्ला मुरंजन उर्फ प्रबळगड.
इतिहास
उत्तर कोकणातील हा किल्ला त्याच्या मुलुखात असलेल्या पनवेल, कल्याण या प्राचीन बंदरावर नजर ठेवण्यासाठी असावा. किल्ल्यावरील गुहांच्या अभ्यासावरून त्यांचा कालखंड बो॓द्ध् कालाशी जोडता येतो. त्यांच्यावरील मनुष्यनिर्मित गुहांमुळेच उत्त्तरकालातील शिलाहार, यादव या राज्यकर्त्यांनी या किल्ल्याला लष्करी चौकी बनवून नाव दिले मुरंजन. बहामनीच्या कालात हा किल्ला आकारात आला असावा.
नंतर हा किल्ला अहमदनगरच्या निजामशाहीच्या ताब्यात आला. निजामशाहीच्या अस्ताच्या वेळी शहाजीराजांनी निजामशाहीच्या वारसाला छत्र धरून निजामशाही वाचवण्याचा प्रयत्न केला. पण मोगल शहाजहान आणि विजापूरचा अदिलशहा यांनी तह करून आपल्या संयुक्त फौजा शहाजीराजांच्या मागावर पाठवल्या तेव्हा शहाजीराजे यांनी पळ काढून कोंढाणा व मुरंबदेवाच्या डोंगरात निघुन गेले. नंतर कोकणात जंजिऱ्या सिद्धिकडे गेले असता त्याने आश्रय नाकारल्यावर चो॓लला पोर्तुगीजांकडे गेले. पण त्यांनीही नकार दिल्यावर शहाजीराजे जिजाऊ, बालशिवाजी आणि लष्करासह मुरंजनावर गेले. सन १६३६ मध्ये बालशिवाजींनी मुरंजनाचा उंबरठा ओलांडला. १६३६ मध्ये माहुलीचा तह झाला. त्यात कोकण मोगलांच्या ताब्यात गेले आणि मुरंजनवर मोगली अंमल सुरु झाला. पण प्रत्यक्षात तेथे विजापूरच्या अदिलशहाचीच सत्ता होती. पुढे ही संधी शिवरायांनी साधली. जेव्हा शिवरायांनी जावळीच्या चंद्रराव मोरेल हरवून जावळी तब्यात घेतली, त्यावेळी म्हणजे १६५६ मध्ये शिवरायांचा शूर सरदार आबाजी महादे ह्याने कल्याण भिवंडी पासून चेऊल ते रायरीपर्यंतचा सारा मुलूख स्वराज्यात घेतला. तेव्हा मुरंजन शिवाजी महाराजांच्या ताब्यात आला. या किल्ल्याचे नाव बदलून किल्ले प्रबळगड ठेवण्यात आले. पुढे १६६५ मध्ये पुरंदरच्या तहानुसार शिवाजी महाराजांनी मोगलाना दिलेल्या २३ किल्ल्यांमध्ये प्रबळगड दिला. जयसिंगाने किल्ल्यावर राजपूत केशरसिंह हाडा हा किल्लेदार नेमला. पुढे पुरंदरचा तह मोडला. मराठे किल्ले परत घेत असताना मराठ्याशी झालेल्या लढाईत केशरसिंह धारातीर्थी पडला तत्पूर्वी राजपूत स्रियांनी जोहार केला. केशरसिंहाची आई व दोन मुले किल्ल्याच्या झडतीत सापडले. शिवरायांच्या आदेशानुसार त्यांना सन्मानाने देऊळगावी मोगल छावणीत पाठवण्यात आले. नंतर किल्ल्यावर खोदकामात बरीच संपत्ती आढळली.
गडावरील पहाण्यासारखी ठिकाणे
प्रबळगडचा माथा म्हणजे एक मोठे पठार आहे. सर्व पठारी भाग हा जंगलाने व्यापलेला आहे.
- गडावर एक गणेश मंदिर आहे. तसेच तीन पाण्याच्या टाक्या सुद्धा आहेत. मात्र ही टाकी शोधण्यासाठी व गडावर फिरण्यासाठी पाण्याच्या बाटल्या घेणे आवश्यक आहे.
- प्रथम इंग्रजांनी प्रबळगडचा माथेरान सारखे थंड हवेचे ठिकाण म्हणून करण्याचा विचार केला होता मात्र पाण्याच्या दुर्भिक्ष्यामुळे तो विचार मागे पडला.
- गडावर तीन चार इमारतींचे अवशेष आहेत. घनदाट कारवीच्या जंगलामुळे गडावरील वाटा नीट दिसत नाहीत.
- मात्र गडावरून माथेरानचे विविध पॉंईट फार सुंदर दिसतात, गड सध्या पर्यटन स्थळ बनला असून देशातील व देशाबाहेरील बरीच लोक ही महाराष्ट्राची ऐतिहासिक संपती पाहण्यासाठी येत असतात. गडावर चढण्याच्या पहिल्या टप्प्यावर एक ढाबा असून तिथे जेवणाची व राहण्याची उत्तम सोय असते, त्यामुळे पर्यटन प्रेमिंची संख्या वाढत चालली आहे.