थोर समाज सुधारक:गोपाळ गणेश आगरकर

गोपाळ गणेश आगरकर (जन्म : टेंभू-सातारा, १४ जुलै १८५६; – १७ जून १८९५) हे महाराष्ट्रातील विचारवंत, समाजसुधारक, पत्रकार व शिक्षणतज्ज्ञ होते. आधुनिक महाराष्ट्राच्या इतिहासात सामाजिक जागृतीत आगरकरांचे योगदान मोलाचे आहे. त्यांनी समाज प्रबोधन करण्यासाठी सुधारक, केसरी व मराठा या वृत्तपत्रांचा आधार घेतला. सामाजिक समता, स्त्री-पुरुष समानता आणि विज्ञान‌-निष्ठा‌ ही त्यांची जीवनमूल्ये होती. मुलींनासुद्धा शिक्षण मिळायला पाहिजे असा लेख त्यांनी सुधारक या वृत्तपत्रात लिहिला.

बुद्धिप्रामाण्य वादाचे पुरस्कार करून महाराष्ट्रामध्ये समाज सुधारणा घडून आणणे या उद्देशाने समाजसुधारणा करणाऱ्या समाजसुधारकांमध्ये गोपाळ गणेश आगरकर यांचा समावेश होतो. महाराष्ट्रातील समाज सुधारकांच्या मांदियाळीतील क्रांतीकारी समाजसुधारक म्हणून आगरकर हे महत्त्वपूर्ण ठरतात.

आरंभीचा काळ

आगरकरांचा जन्म सातारा जिल्ह्यातील टेंभू या खेड्यात झाला. घरच्या गरिबीमुळे शिक्षणाचा खर्च भागविण्यासाठी त्यांना अनेक मार्ग चोखाळावे लागले. कधी मामलेदार कचेरीत उमेदवारी करून, कधी मधुकरी मागून तर कधी कंपाउंडरचे काम करून त्यांनी आपले मॅट्रिकपर्यंतचे शिक्षण पूर्ण केले. शिक्षणासाठी ते कऱ्हाड, अकोला, रत्‍नागिरी येथे गेले. १८७५ साली ते मॅट्रिक झाले व महाविद्यालयीन शिक्षण घेण्यासाठी पुण्याला आले. पुण्यात त्यांनी डेक्कन कॉलेजला प्रवेश घेतला. वर्तमानपत्रात लिखाण करणे, वक्तृत्व स्पर्धा, निबंध स्पर्धा यांत भाग घेऊन बक्षिसे जिंकणे, शिष्यवृत्ती मिळवणे अशा प्रकारे त्यांची गुजराण चालत असे. गोपाळ गणेश आगरकर व लोकमान्य टिळक यांची ओळख १८७९मध्ये एम. ए. करताना झाली. त्यांनी एकत्रच शिक्षण घेतले होते. त्यांनीच त्यावेळेस केसरी वृत्तपत्र सुरू करायचे ठरवले होते. त्यात लोकमान्य टिळक, गोपाळ गणेश आगरकर व विष्णूशास्त्री चिपळूणकर या तिघांचा पुढाकार होता.

कारकीर्द

आगरकर हे बाळ गंगाधर टिळकांनी सुरू केलेल्या केसरी वृत्तपत्राचे पहिले संपादक (१८८०-१८८१) होते.१५ ऑक्टोंबर १८८७ला केसरी वृत्तपत्राचे संपादकत्व सोडले

पुण्यात महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना लोकमान्य टिळक व आगरकर या दोघांच्याही मनात स्वदेशसेवेची प्रेरणा जागी झाली. दिनांक १ जानेवारी, १८८० रोजी विष्णूशास्त्री चिपळूणकरांनी ‘न्यू इंग्लिश स्कूल’ची स्थापना केली. आगरकर १८८१ मध्ये एम. ए. झाल्यावर चिपळूणकरांना जाऊन मिळाले. आगरकर व टिळक यांनी १८८१ मध्ये इंग्रजीतून ‘मराठा’, तर मराठीतून ‘केसरी’ अशी दोन वृत्तपत्रे चालू केली. केसरीचे संपादकत्व आगरकरांनी स्वीकारले.

पुढे लोकमान्य टिळक व आगरकर यांनी २४ ऑक्टोबर १८८४ला डेक्कन एज्युकेशन सोसायटीची स्थापना केली व त्या अंतर्गत १८८५ साली फर्ग्युसन कॉलेजची स्थापना झाली. आगरकर याच कॉलेजात शिकवू लागले, पुढे ते फर्ग्युसनचे प्राचार्यही झाले.

उल्लेखनीय कार्य

१८८४ साली बाळ गंगाधर टिळक, विष्णूशास्त्री चिपळूणकर आणि आगरकरांनी पुण्यात ‘डेक्कन एज्युकेशन सोसायटी’ स्थापली.

१८८८ साली त्यांनी ‘सुधारक’ हे वृत्तपत्र सुरू केले.

गोपाळ गणेश आगरकर हे, भौतिकता – ऐहिकता, बुद्धिप्रामाण्यवाद, व्यक्तिस्वातंत्र्य या आधुनिक तत्त्वांना प्रमाण मानून जिवाच्या कराराने समाज सुधारणांचा पाठपुरावा करणारे समाजप्रबोधक होते. महाराष्ट्रातील समाज परिवर्तनाच्या प्रक्रियेला विवेकाचे, बुद्धिप्रामाण्याचे व व्यक्तिस्वातंत्र्याचे अधिष्ठान देऊन, परिवर्तनाचे विज्ञाननिष्ठ तत्त्वज्ञान निर्माण करण्याचे श्रेय गोपाळराव आगरकरांकडे जाते. सामाजिक परिवर्तनाच्या चळवळीला गती या काळामध्ये प्राप्त करून देण्याचे काम गोपाळ गणेश आगरकर यांनी केले विज्ञाननिष्ठ दृष्टिकोन स्वीकारून ग्रंथ ब्राह्मण्याला विरोध करत बुद्धिप्रामाण्य चिक रास धरणारे तत्कालीन सुधारकांनी मध्ये आपला विचार परखडपणे मांडणारी सुधारक म्हणून आगरकर हे उल्लेखनीय आहेत

आगरकरांनी बुद्धिवादाचा आधार घेऊन सामाजिक सुधारणांचा पुरस्कार केला. बुद्धीला पटेल तेच स्वीकारले पाहिजे. केवळ अंधानुकरण करून ग्रंथांमध्ये दिले आहे म्हणून ते स्वीकारणे अयोग्य ठरते. रुढी प्रामाण्याऐवजी वैज्ञानिक कार्यकारणभावांनी युक्त बुद्धिप्रामाण्यवाद रुजविण्याचा त्यांनी प्रयत्न केला. स्त्री सुधारणेचा पुरस्कार करताना स्त्रियांना देखील पुरुषांच्या बरोबरीने हक्क व अधिकार असले पाहिजेत हा विचार् प्रभावीपणे त्यांनी मांडला. ‘स्त्रियांनी जाकिटे घातली पाहिजेत’. असे ते म्हणत. याचाच अर्थ असा होता की पुरुषांच्या बरोबरीने स्त्रियांना समाजामध्ये महत्त्वाचे स्थान असले पाहिजे. राजकीय स्वातंत्र्याआधी समाजसुधारणा महत्त्वाची आहे. बालविवाह, अस्पृश्यता यांसारख्या समाजातील अनिष्ट रूढी आधी नष्ट केल्या पाहिजेत अशा विचारांचे ते होते. समाजसुधारणा विरुद्ध राजकीय स्वातंत्र्य याच वादातून १८८७ च्या ऑक्टोबरमध्ये त्यांनी केसरीचे संपादकत्व सोडले. १८८८ साली त्यांनी ‘सुधारक (वृत्तपत्र)’ हे वृत्तपत्र सुरू केले. व्यक्तिस्वातंत्र्य, बुद्धिवाद, भौतिकता या मूल्यांचा प्रचार त्यांनी सुधारकमधून केला, तसेच जातिव्यवस्था, चातुर्वर्ण्य, बालविवाह, ग्रंथप्रामाण्य- धर्मप्रामाण्य, केशवपन इत्यादी अन्यायकारक परंपरांना त्यांनी विरोध केला. अंधश्रद्धा, पाखंडीपणा यांच्यावर प्रहार केले. सुधारक हे इंग्रजी व मराठी या दोन्ही भाषांतून प्रकाशित केले जात होते. इंग्रजी सुधारकची जबाबदारी काही काळ नामदार गोखले यांनी सांभाळली होती. आगरकरांनी व्यक्तिस्वातंत्र्याचा पुरस्कार केला समाजाने व्यक्तिस्वातंत्र्याचा पुरस्कार करून समाजातील त्या-त्या घटकाला स्वातंत्र्य देणे आवश्यक आहेत याला स्त्रिया देखील अपवाद असता कामा नयेत श्री स्वातंत्र्याचा देखील पुरस्कार झाला पाहिजे याचा पुनरुच्चार आगरकरांनी केला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *